‘माणूस एआय’ : टास्क पूर्ण करणारा चीनी चमत्कार !

कृत्रीम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत असतांनाच एका नवख्या चिनी कंपनीने सादर केलेल्या माणूस या टुलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीपीसीक व क्वॉन या चॅटबॉटमुळे चीन्यांनी एआयमध्ये निर्णायक आघाडी घेतलेली असतांनाच आता ‘माणूस’च्या माध्यमातून थेट टास्क पूर्ण करणारे साधन सादर केल्याने अन्य देशांमधील कंपन्यांना खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

शेखर पाटील

यंदाचे म्हणजेच 2025 हे वर्ष एआय एजंटचे असेल असे आधीच तज्ज्ञांनी भाकित केले आहे. या अनुषंगाने अनेक कंपन्यांनी आपापले एआय एजंटस्‌‍ युजर्सच्या सेवेत रूजू केले असून यात प्रत्येक दिवसाला भर पडतच आहे. चॅटजीपीटी वा त्याच्यासारखे अन्य चॅटबॉट हे युजर्सने दिलेल्या आज्ञावली (प्रॉम्प्ट) नुसार त्यांच्यासाठी काम करतात. तर एआय एजंट हे थेट युजरने ठरवून दिलेल्या टास्कवर काम करतात. याचे सोपे उदाहरण घेऊया. समजा मला दिल्ली येथे जायचे आहे, तर चॅट-जीपीटी वा अन्य टुल्स हे तेथील पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदींची माहिती मला देईल. तर एआय एजंट हा माझ्या वतीने कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून मी दिलेल्या निर्देशांच्या प्रमाणे माझ्यासाठी तिकिट वा हॉटेलची बुकींग आदी कामे करेल. अर्थात एआय एजंट हा टास्क पूर्ण करणारा सांगकाम्या असल्याचे आपण म्हणू शकतो. चॅटजीपीटी लाँच करणाऱ्या ओपनएआयसह अनेक कंपन्यांनी विविध टास्क पूर्ण करणारे एआय एजंट आधीच सादर केले आहेत. सद्यस्थितीत अशा प्रकारचे शेकडो एजंट उपलब्ध असले तरी ते फक्त प्राथमिक स्वरूपाची कामे पूर्ण करण्यास सक्षम आहेत.

यातच आता ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या लहानशा आणि कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या चीनी कंपनीने माणूस या नावाने लाँच केलेल्या एआय एजंटने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आपल्यासाठी यातील मजेशीर बाब म्हणजे याचे माणूस हे नाव होय. लॅटीन भाषेत ‘मेन्स एट माणूस’ ( mens et manus ) हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ मन आणि हात असा होतो. अर्थात कोणतेही काम हे ज्ञान आणि कृती याच्या मिलाफातून होत असल्याचा या वाक्प्रचाराचा अर्थ होय. अमेरिकेतल्या जगविख्यात एमआयटी या शैक्षणिक संस्थेचे ‘मेन्स एट माणूस’ हेच बोधवाक्य आहे. यातीलच ‘माणूस’ अर्थात हात व पर्यायाने ॲक्शन म्हणजेच कृती हे नाव या नवीन एआय एजंटला प्रदान करण्यात आले असून ते कोणतेही काम चुटकीसरशी करण्यास सक्षम आहे.

नावात नमूद असल्यानुसार ‘माणूस’ हे कृतीशील असे टुल होय. याची मालकी असणाऱ्या Butterfly Effect कंपनीने या टुलचा जगभरातील मर्यादीत युजर्सला ॲक्सेस दिला असून कोट्यवधी युजर्सनी यासाठी नोंदणी केली आहे. तथापि, कंपनीने माणूसच्या कार्यप्रणालीबाबत सादर केलेला व्हिडीओ पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. यात माणूसला युजरने न्यूयॉर्क शहरात अमुक-तमुक बजेटनुसार घर भाड्याने हवे असल्याचे काम सांगितले. यावर माणूसने ‘रिअल टाईम’ माहिती जाणून घेत त्या युजरला थेट घर भाड्याने मिळवून दिले. यासोबत माणूसला एका कंपनीकडे नोकरीसाठी आलेल्या अर्जांमधून सर्वात योग्य उमेदवारांची निवड करण्यास सांगितले असता त्याने नोकरीचे सर्व आवेदनपत्रे काळजीपूर्वक वाचून आवश्यक त्या निकषांनुसार उमेदवारांची निवड देखील सुचविली हे विशेष ! तसेच हे टुल विविध कंपन्यांच्या स्टॉक्सचे अचूक विश्लेषण देखील करू शकते. ‘माणूस एआय’च्या वतीने जारी करण्यात आलेल्या व्हिडीओत अशा स्वरूपाचे अनेक टास्क पूर्ण होतांनाचे दर्शविण्यात आले आहे. तर, माणूसच्या संकेतस्थळावर सादर करण्यात आलेल्या डेमो व्हिडीओत याची अनेक उदाहरणे देखील दिलेली आहेत. आपण हा व्हिडीओ खालील लिंकवर पाहू शकतात.

माणूसच्या कार्यप्रणालीबाबतचा व्हिडिओ

लक्षणीय बाब म्हणजे माणूस हे टुल कोणतेही टास्क पूर्ण करत असतांना नेमक्या कोणत्या माहितीचा वापर करते हे देखील त्या युजरला दाखवते. परिणामी माणूस हे अतिशय कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक असे टुल असल्याचे जगभरातील तज्ज्ञांचे मत बनले आहे. यात युजरने दिलेल्या टास्कचे सुक्ष्म विश्लेषण, नियोजन आणि कार्यान्वयन या तिन्ही प्रक्रिया अतिशय गतीमान व अचूक पध्दतीत होत असल्याची बाब ही नाविन्यपूर्ण आहे. अर्थात, याचमुळे सर्व जण माणूसचा वापर करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तर माणूसच्या वेबसाईटवरील विविध डेमोजनी ही उत्सुकता अजूनच वाढविली आहे.

कृत्रीम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रात जगात तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. विविध कंपन्या आणि सरकारे देखील यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. यातच चीनने अलीकडच्या काळात मोठी आघाडी घेतली आहे. चीनी कंपनीने ‘डीपसीक आर-1’ हे चॅटजीपीटी पेक्षा अधिक गतीमान व त्यापेक्षा किफायतशीर मूल्यात तयार केलेले मॉडेल हे जगभरात तुफान लोकप्रिय झाले आहे. हे टुल मोफत उपलब्ध असल्याने ओपन एआय, मेटा, गुगल आदी कंपन्यांना धडकी भरली आहे. या संदर्भात मी आधीच विस्तृत विवेचन केले आहे. या पाठोपाठ आता माणूसच्या माध्यमातून एआय एजंटच्या क्षेत्रात देखील चीनने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश चीनी कंपन्या एआयच्या क्षेत्रात वेगाने आगेकूच करत आहेत. यात अलीबाबा व बाईटडान्स सारख्या अजस्त्र कंपन्यांपासून ते लहान-सहान स्टार्टपचा समावेश आहे. एआय क्रांतीच्या युगात चीनची ही आगेकूच अन्य देशांमधील कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता यातून स्पष्ट झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top