कृत्रिम बुद्धिमत्तेचा चमत्कार: ‘एल फोलिओ’ने रचला इतिहास

कृत्रीम बुध्दीमत्ता ही मानवी प्रज्ञेशी कधीही बरोबरी करणार नसल्यामुळे पत्रकार, लेखक, कवि, कलावंत वा अन्य सृजनशील मंडळीला एआयचा जराही धक्का बसणार नाही असा युक्तीवाद अनेकदा करण्यात येतो. यावरून माझे पत्रकार मित्र अनेकदा माझ्याशी वाद घालतात. तथापि, आता अशी एक घटना घडलीय की जगभरातील पत्रकारांना एआयबाबत गांभियाने विचार करण्याची वेळ आली आहे.

सध्या माझ्या अभ्यासाचा विषय हा कृत्रीम बुध्दीमत्ता असला तरी यात मी प्राधान्याने एआयचा मीडियावर होणारा परिणाम डोळसपणे अनुभवत असतो. पत्रकारित्ोला एआय कशा पध्दतीने बदलत आहे ? यावर मी गांभिर्याने मंथन करत करून स्वत:मध्ये बदल घडवत असतो. या अनुषंगाने जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल अशी घटना सध्या घडली आहे. इटलीतील ‘एल फोलिओ’ ( Il foglio ) या वर्तमानपत्राने आपला संपूर्ण अंक हा मानवी पत्रकार नव्हे तर एआय टुल्सच्या मदतीने तयार करून प्रसिध्द केल्याची घटना घडली आहे. म्हणजे याच्या अंकातील सर्वच्या सर्व बातम्या, लेख, रेखाटने आदी या एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या आहेत. या वर्तमानपत्राने सर्व पत्रकारांना बाजूला सारून एआय टुल्सचा वापर करून दैनिकाला तयार करण्यात आल्याची बाब ही ऐतीहासीक अशीच मानावी लागणार आहे.

पत्रकारितेत एआय टुल्सचा वापर हा तसा नवलाईचा विषय राहिलेला नाही. आम्ही कधीपासूनच याचा विपुल वापर करत आहोत. आमच्या पेक्षा मोठ्या व आर्थिक दृष्टीने मजबूत असणाऱ्या न्यूजरूम्समध्ये याचा वेग हा अजून जास्त असेल हे निश्चीत. आधी अगदी एखाद्या लेखाचा सार काढून वाचणे, व्याकरणाची दुरूस्ती आदी सटर-फटर कामे एआयच्या मदतीने होत असतांना अलीकडच्या काळात याचा वापर विलक्षण वेगाने वाढला असून ‘एल फोलिओ’ या इटालियन दैनिकाने मंगळवार दिनांक १८ मार्ज २०२५ रोजी चक्क आपली संपूर्ण आवृत्ती ही एआय जनरेटेड मजकुराच्या मदतीने तयार केली आहे. तर या अंकाचा ई-पेपर आणि सर्व बातम्या या दैनिकाच्या वेबसाईटवर ( https://www.ilfoglio.it ) देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जागतिक पातळीवर एखादे वर्तमानपत्र हे पूर्णपणे एआयच्या मदतीने प्रसिध्द करण्याची ही नक्कीच पहिली घटना असावी. याचमुळे एल फोलिओची कामगिरी ही दखलपात्र ठरणारी आहे.

एल फोलिओ वर्तमानपत्राची आवृत्ती ही ब्रॉडशीट चार पानांची असून यातील बहुतांश मजकूर हा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या तिन्ही पातळींवरील असतो. या अनुषंगाने सदर वर्तमानपत्राच्या ताज्या अंकातील सर्व मजकूर हा एआयच्या मदतीने निर्मित करण्यात आलेला आहे. यात बातमीचे शीर्षक, मुख्य बातमी वा लेखच नव्हे तर थेट वाचकांची पत्रे देखील एआयनेच तयार केलेली आहेत. यात इटली, रशिया आणि अमेरिकेच्या राजकारणावरील विस्तृत बातम्यांचा समावेश आहे. अगदी खऱ्याखुऱ्या पत्रकारांनी लिहलेल्या वाटाव्यात अशा या बातम्या होय. फक्त यात कुणाही नेत्याचे अधिकृत वक्तव्य ( कोट ) घेण्यात आलेले नाही.

तंत्रज्ञानाचा आणि त्यात देखील एआयचा मीडियावर नेमका काय परिणाम होतोय ? या अनुषंगाने प्रयोग करतांना एल फोअलने थेट एआयच्या मदतीने संपूर्ण वर्तमानपत्र तयार करून दाखविल्याची माहिती या दैनिकाचे संचालक क्लाडिओ सेरसा यांनी दिली असून या प्रकारचे प्रयोग अजून व्यापक प्रमाणात करण्यात येतील असे त्यांनी नमूद केले आहे. तर भविष्यात पत्रकारांचे एकमेव काम म्हणजे एआय टुलला आज्ञा देऊन त्यांनी दिलेले उत्तर वाचन करणे इतकेत उरणार असल्याचे भाकित देखील त्यांनी करून टाकले आहे.

मुळातच, विलक्षण गतीमान, सर्वव्यापी आणि मोफत अशा सोशल मीडियामुळे प्रसारमाध्यमांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे प्रत्येक वर्तमानपत्र वा वृत्तवाहिनी ही कॉस्ट कटींग करत असल्याचे आधीच दिसून येत आहे. यातच ‘एल फोलिओ’ या दैनिकाने एकाही मानवी पत्रकाराची मदत न घेता एआय टुल्सच्या मदतीने आपला संपूर्ण अंक प्रकाशित केल्याची बाब ही मीडियाचे ऑटोमेशन हे प्रचंड गतीने होत असल्याचे दर्शविणारी आहे. यासोबत, एआयमुळे प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे संकेत देखील यातून मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे दैनिक ‘एल फोलिओ’चे संचालक क्लाडिओ सेरसा यांनी म्हटल्यानुसार लवकरच पत्रकारांचे काम हे फक्त एआय मशिन्स आणि काँटेंट यांच्यातील दुवा इतकेच उरणार आहे. परिणामी, जे काळाच्या वेगानुसार स्वत: बदलणार तेच टिकणार, अन्यथा त्यांची जागा ‘रिप्लेस’ करण्यासाठी त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने वेगवान व अचूक काम करणाऱ्या एआय मशिन्स तयार आहेतच. ‘एल फोलिओ’च्या प्रयोगातून हेच दिसून आले आहे. आणि हा धोका फक्त वर्तमानपत्रच नव्हे तर वृत्तवाहिन्या व डिजीटल पोर्टल्समध्ये काम करणाऱ्यांसह स्वतंत्रपणे युट्युब चॅनल चालवणाऱ्यांना देखील असेल हे समजून घ्यावे लागेल.

शेखर पाटील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top